२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं या चळवळीचा आवाज बनली होती. अस्पृश्योद्धारासाठीच्या पत्रकारीतेच्या क्षितीजावर बाबासाहेबांचा उदय होण्याआधी 'विटाळविध्वंसक' लिहणारे गोपाळबाबा वलंगकर, 'सोमवंशीय मित्र' संपादित करणारे शिवराम जानबा कांबळे, 'निराश्रित हिंदू नागरिक' चे किसन फागूजी बनसोडे यांनीही मोठं काम करुन ठेवलं होतं. अमेरिकेहून परतलेल्या बाबासाहेबांना पक्की जाणीव होती की, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचं वर्तमानपत्र असावं लागतं. ज्या चळवळीचं वर्तमानपत्र नसतं त्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षासारखी असते. म्हणूनच मुकनायकचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. शनिवार, ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी 'मूकनायक' पाक्षिक म्हणून सुरू केलं. संस्थापक बाबासाहेब तर संपादकपदाची धुरा विदर्भवासी पांडुरंग नंदराम भटकर यांच्याकडे होती. या पत्राच्या प्रकाशनासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी २५०० रुपयांची देणगी दिली होती. मुकनायकच्या पहिल्या अंकात मनोगत या मथळ्याखाली संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला अग्रलेख लिहिला. त्यामध्ये त्यांनी मुकनायकच्या उद्दिष्टांविषयी स्पष्ट प्रतिपादन केलं. "आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाय योजना सुचविण्यास तसंच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच नाही; परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे, तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच विरोध आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींनाही बसल्याशिवाय राहणार नाही." असं बाबासाहेबांनी पहिल्या अंकातील निवेदनात लिहलं.
'मूकनायक' सुरू झालं तेव्हा लोकमान्य टिळक हयात होते. परंतु त्यांच्या 'केसरी'ने 'मूकनायका'ची पोच तर दिली नाहीच, पण पैसे घेऊन जाहिरात देण्याचंसुद्धा नाकारलं. हे खुद्द डॉ. बाबासाहेबांनीच नमूद केलं आहे. 'मूकनायका'ने मूक्यांच्या वेदनांना वाचा फोडली, निराधाराला आधार मिळाला, विचाराला चालना मिळाली. बाबासाहेब आपल्या लेखात लोकम्हणी व लोकवाक्प्रचारांचा उपयोग हमखास करीत. अर्थवाही शब्दरचना आणि ठोस मनाला भिडणारी लेखनशैली, यामुळे 'मूकनायक' चांगलच गाजलं. बाबसाहेबांवर संतांचा प्रभाव होता. बाबासाहेबांनी मुकनायक या पाक्षिकावर संत तुकारामांची बिरुदावली छापली होती.
काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||१||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||
बाबासाहेब पुढे आपले अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेले. अशात आर्थिकबाजू ढासळली आणि ८ एप्रिल १९२३ रोजी 'मूकनायक' बंद झालं. १९२४ रोजी बाबासाहेब भारतात आले. त्यानंतर त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. महाडच्या चवदार तळ्याच्या पार्श्वभूमीवर दुसरे पाक्षिक म्हणजे 'बहिष्कृत भारत' काढलं. रविवार, ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत'चा पहिला अंक प्रकाशित झाला. 'बहिष्कृत भारता'त बाबासाहेबांनी 'आजकालचे प्रश्न' व 'प्रासंगिक विचार' या दोन सदरांत स्फुट लेखन केलं. बाबासाहेबांना 'मूकनायक'मध्ये फारसे लिहिता आले नाही. पण 'बहिष्कृत भारत'मध्ये त्यांची भाषा ओजस्वी आहे. शत्रूवर टीका करताना ते नामोहरम करण्यासाठी युक्तीवादाचं मोठं हत्यार बाबासाहेब वापरत. नंतरच्या काळात आर्थिक तरतूद करणं बाबासाहेबांना शक्य झालं नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत १५ नोव्हेंबर, १९२९ रोजी बंद पडलं. नंतरच्या काळात २९ जून १९२८ रोजी 'समता', २४ नोव्हेंबर १९३० रोजी 'जनता' व पुढे 'प्रबुद्ध भारत' अशी आवश्यकतेनुसार त्यांनी वृत्तपत्रे बाबासाहेबांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आली, पण या वृत्तपत्रांचे संपादक बाबासाहेब नव्हते.
बाबासाहेबांनी लिहलेले अग्रलेख मोठ्या प्रमाणात गाजले. हिंदू महासभा का ठकांची बैठक, अस्पृश्यांचा प्रश्न घरचा का राष्ट्राचा?, लबाड कोण? काँग्रेस की मजुरांचे पुढारी?, राष्ट्रप्रेम का सवतीची पोटदुखी, इंग्रजांची धोकेबाजी असे बाबासाहेबांचे अनेक अग्रलेख गाजले. हिंदू महासभेवरच्या अग्रलेखात ते म्हणतात, 'जातिभेद कायम ठेवून हिंदूंच्या संघटना करू म्हणणे म्हणजे आवळ्याची मोट बांधून त्यांचे एकीकरण केल्याचे समाधान मानण्याइतकेच मूर्खपणाचे आहे. येवल्याच्या सभेत स्पष्टपणे जाहीर करण्यात आलं होतं की हिंदू समाजाची घटना असमानतेच्या पायावर उभारली असल्याकारणाने अस्पृश्यांना त्या धर्मात राहणं शक्य नाही. या असमानतेचे मूळ जातिभेदात आहे आणि त्यावर कुठार घालण्याशिवाय अन्य मार्ग नाही.' १९४१ रोजी झालेल्या दंगलीबद्दल बाबासाहेबांनी 'दंगा झाला, दंगा झाला, काही उपाय नाही त्याला' या अग्रलेखात त्यांनी लिहलं आहे. या लेखात बाबासाहेबांनी दंगा धार्मिक नसून राजकिय कसा होता, हे बाबासाहेबांनी समजावून सांगितलं.
अस्पृश्य समाज हा एकप्रकारे मुकाच होता. अशा लोकांना बाबासाहेबांनी 'मुकनायक'च्या माध्यमातून नायक बनवलं. त्यांच्या दुखांना, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. 'बहिष्कृत भारता'तील जीवनावर प्रकाश टाकत, समाजात 'समते'ची ज्योत पेटवली.
- गिरीश कांबळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा