गुरुवार, ५ जुलै, २०१८

राम मंदिर, बाबरी मस्जिद आणि राजकारण


राम मंदिर, बाबरी मस्जिद आणि राजकारण

      राम जन्मभूमीवरील प्रस्तावित मंदिर आणि देशाच्या राजकीय पटलावर रंगणारे महाभारत यांचे एक अतूट नाते आहे. आजवर संघ परिवार आणि काही राजकीय पक्षांनी हा विषय धगधगता ठेवून आपापली पोळी भाजून घेण्याचे काम सुरु ठेवले आहे. गेली शेकडो वर्षे धर्म, राजकारण आणि कायदा यांच्या जाळ्यात अयोध्या प्रश्न पुरता अडकला आहे. श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा धार्मिक वाद न्यायालयात लोंबकळत पडत असताना मतांच्या राजकारणासाठी या वादाचा पुरेपूर वापर करून घेण्यात आला आहे. आणि या सगळ्यात सर्वाधिक फायदा झाला तो भाजप या पक्षाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. पुढील निवडणुकीचा विचार करता आता पुन्हा एकदा हिंदूना धोका निर्माण होईल. “हिंदू खतरेमे है” अशा घोषणा पक्षांच्या व्यासपीठावरून येतील. त्यांची रामजन्मभूमी धोक्यात येईल.


      रामजन्मभूमीच्या राजकारणाला सुरुवात झाली ती राजीव गांधी सरकारच्या काळात. एका मुस्लिम महिलेला (शहाबानो) पोटगी देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. हा आदेश सामाजिकदृष्ट्या योग्य होता. पण व्होट बँकेच्या समीकरणांत आपले नुकसान होईल अशी भीती केंद्रातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांना वाटल्यामुळे संसदेतील बहुमताच्या जोरावर कोर्टाचा निर्णय बदलला. हाच तो प्रसंग जिथून राम जन्मभूमीच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मुस्लिमांसाठी सरकार कोर्टाचे निर्णय बदलत आणि हिंदुना जन्मभूमीवर जाऊन रामाची पूजा करता येत नाही. असा मुद्दा उपस्थित करून संघ परिवाराने राजीव गांधी सरकारपुढे पेच निर्माण केला. संघ परिवाराने राम मंदिराचा मुद्दा करून असंख्य जातींमध्ये विभागलेल्या हिंदुना एकत्र केले. त्यामुळे राम मंदिराबाबत निर्णय घेताना चूक झाल्यास आपण बहुसंख्यांकांच्या मनातील स्थान गमवणार या भीतीपोटी राजीव गांधी सरकारने संघ परिवाराला रामाची पूजा करण्याची परवानगी दिली. पंतप्रधान राजीव गांधींनी घेतलेल्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले.      सरयू नदीकाठी वसलेल्या अयोध्येच्या मध्यवर्ती भागात रामजन्मभूमी आहे. याच जमिनीवर श्रीरामजन्माची आठवण म्हणून राम मंदिर होते, असा दावा हिंदुत्वादी संघटनांनी सुरु केला. तर इथे कधी मंदिर नव्हतेच, होती ती राजा बाबरने बांधलेली मशीद, असे मुस्लिम संघटना सांगू लागल्या. वाद सुरू झाला आणि भाजपच्या अध्यक्षपदी असताना लालकृष्ण अडवाणींनी सुरु केलेल्या रथयात्रेने या वादाची तीव्रता आणखी वाढली. हिंदुत्ववादी मंडळींनी बाबरी मशिदीचे सगळे बांधकाम पाडून टाकले. २४ नोव्हेंबर २००९ ला एक हजार पानांचा लिबरहान आयोगाचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला. देशभर धार्मिक द्वेष पसरविल्याबद्दल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी तसेच संघ परिवारातील नेते आणि ११ नोकरशहांसह ६८ जणांना दोषी ठरविण्यात आले. ही घटना एकाएकी घडली नाही आणि ती सुनियोजित नव्हती असेही म्हणता येणार नाही. मशीद जमीनदोस्त करण्याची सारी प्रक्रिया अतिशय नियोजनपूर्वक राबवण्यात आली होती. मध्यंतरी “बाबरी मशीद माझ्या सांगण्यावरून पाडण्यात आली” असा दावा भाजपचे माजी खासदार आणि रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी केला होता. ज्या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली, त्या दिवशी कारसेवकांनी वशिष्ट भवनात येऊन आता काय करायचे अशी माझ्याकडे विचारणा केली. त्यावेळी मी त्यांना म्हटले कि, जोपर्यंत ही मशीद पडणार नाही तोपर्यंत मंदिराची निर्मिती होणार नाही. रात्री ११ वाजता तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी मला दूरध्वनी करून उद्या काय होणार आहे, असे विचारले. त्यावेळी मी त्यांना कारसेवकांना दिलेल्या सूचनेची माहिती नरसिंहराव यांना दिली. त्यावेळी नरसिंहराव म्हणाले, मशीद पडू द्यात, जे काही होईल टे पाहता येईल, अशी धक्कादायक माहिती वेदांती यांनी सांगितली. एकंदरीत मशीद जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुनियोजितच होती. मशीद पाडल्यामुळे परिस्थिती चिघळली होती. कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे निमलष्करी दलाच्या सशस्त्र तुकड्यांनी रामजन्मभूमी आणि आसपासचा परिसर सील केला. कडेकोट बंदोबस्तात एका मातीच्या ढिगाऱ्यावर तंबूमध्ये रामाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. आता निवडणुकीला वर्ष असल्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिराचा प्रश्न निर्माण होईल.      रामाला हाक मारली कि खुशाल समजावे कि, निवडणूक आली. निवडणूक आल्याशिवाय संघवाल्यांना आणि भाजपवाल्यांना रामाची आठवण होत नाही. धर्मनीतीमध्ये राजकारण आणून भाजपने मोठी चूक केली. राम मंदिराला राजकारणात ओढण्याचे काम राजकारण्यांनी केले असून नेत्यांनी राम मंदिरापासून दूर राहण्याचा सल्ला राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिला.

      गावागावांमध्ये जुनी मंदिरे मोडकळीला आलेली आहेत. त्यांचा जीर्णोद्धार केला पाहिजे. परंतु संघवाल्यांना, भाजपवाल्यांना त्याची गरज वाटत नाही. कारण गावातील पडक्या मंदिराचा राजकारणासाठी काही उपयोग होत नाही. राम मंदिरावर राजकारण केले जात आहे, आसे भागवत स्वतःच सांगतात. या भागवत मंडळींची गंमत अशी आहे कि, “एकटयाने खाल्ले तर शेण...सर्वांनी खाल्ले तर श्रावणी...” राम मंदिराचा विषय याच पद्धतीने संघवाले आणि भाजपवाले हाताळतात. देशाच्या राजकारणाला विकृत आणि हिंसक वळण द्यायला याच मंडळींनी रामाला वर्षानुवर्षे वापरलेले आहे.

      संघ-जनसंघ, भाजपा यांची धर्माच्या नावावर राजकारण करण्याची थेट हिंमत होत नाही. मग त्यांनी त्यांच्याच कोटाला असलेला एक खिसा- विश्व हिंदू परिषद म्हणून वापरायला सुरुवात केला. कोणी अशोक सिंघल नावाच्या माणसाला पुढे केले आणि राम मंदिराचा मुद्दा उपस्थित झाला. अडवाणींना पुढे करून मग १९८९ सालात रथयात्रा काढण्यात आली. अशाप्रकारे देव-धर्माच्या नावावर मते मागायची आणि सश्रद्ध माणसांच्या भावनेशी खेळून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. वाजपेयी यांच सरकार आल.त्यानंतर मोदी सत्तेत आले. उत्तर प्रदेश विधानसभा ही जिंकली. “मंदिर वही बनायेंगे” च्या घोषणा कैक वर्षे घुमवण्यात आल्या. परंतु मंदिर काही बांधल गेल नाही. यांनी फक्त आपल्या फायद्यासाठी राम मंदिराचा वापर केला आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतली.

      कित्येक वर्षे देवाचा वापर करणाऱ्या मंडळींना ९ वर्षे केंद्रातील सत्ता मिळालेली आहे. पाच वर्षे वाजपेयी आणि ४ वर्षे मोदी. पण या नऊ वर्षांत “वही बनायेंगे” वाले “नही बनायेंगे” याच भूमिकेत वावरत आहेत. ते अयोध्येत जाऊन “मंदिर वही बनायेंगे” ची घोषणा करणारे तसेच भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत “क्यो नही बनेगा श्रीराम मंदिर? राम राज्याची संकल्पना पूर्ण करायची असेल तर अयोध्येत श्रीराम मंदिर बंधावेच लागेल.” अशी वल्गना करणारे अडवाणी, टे मुरली मनोहर, ते “अयोध्येत श्रीराम मंदिर बंधूच पण प्रतीक्षा आहे ती संधीची. केंद्रात बहुमताने पक्ष सत्तेत आला तर यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य मागण्यात येईल. आणि ते मिळाल नाही तर प्रसंगी कायदा करून श्रीराम मंदिर बांधू” अस सांगणारे राजनाथ सिंह ज्यांनी मंदिर बांधाण्याचा विडा उचलला होता... ते ही आता गायब झालेत. राम मंदिराच्या उन्मादात बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर या देशात एक हिंसक, अस्थिर वातावरण सातत्याने कायम ठेवण्यात भाजपवाल्यांचाच पुढाकार राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर या देशातील सर्वधर्मसमभावाने जगात मोठे आदर्श उभे केले. पण हिंदू-मुस्लिम, शीख-इसाई, गुण्या गोविंदाने नांदतील तर राजकारण्यांना राजकारण कसे करता येईल. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करायची. धार्मिक उन्मादाच्या जोरावरच या देशात भावनात्मक राजकारण करून कधी गाय, कधी गंगा तर कधी राम अशा मुद्द्यांवर राजकारण पेटवत ठेवून आपल्या राजकारणात त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी केला आहे.


      निवडणूक डोळ्यापुढे ठेवून संघ परिवार आणि राजकीय पक्ष राम मंदिराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणतील. तसेच हिंदुना सुद्धा धोका निर्माण होईल. एकूणच रामाचे मंदिर होईल कि नाही माहित नाही. तसेच हिंदुना धोका आहे कि नाही माहित नाही पण ह्या सगळ्याच्या जीवावर लोकांच्या भावनांशी खेळ होतच राहणार, हे मात्र नक्की. राजकारण्यांच्या या खेळात बळी पडायचे नसेल तर सर्वसामान्यांना वेळीच सावध व्हावे लागणार आहे.

-   गिरीश अमिता भाऊ कांबळे
     ( पोंभुर्ले )


२ टिप्पण्या:

पत्रकार बाबासाहेब आंबेडकर...!

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पु...