शनिवार, २५ मे, २०१९

तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी?


तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी?





राज्यात लोकसभा निवडणूकीत शिवसेने सोबत युती करुन निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपला फलदायी ठरला आहे. राज्यात भाजप शिवसेना प्रणित महायुतीने बाजी मारत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४१  जागा आपल्या पदरात पाडल्या आहेत. तर काँग्रेसला एका जागेवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर समाधान मानाव लागलं आहे. तसेच वंचितला एक जागा मिळाली आहे.


प्रकाश आंबेडकर प्रणित वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे भाजप सेना महायुतीला फायदा होईल, हा अंदाज लोकसभा निवडणूकीच्या निकालातुन खरा ठरला आहे. वंचीत बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आघाडीला राज्यात तब्बल ९ जागा गमवाव्या लागल्या. त्यात माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, सोलापुर आणि अशोक चव्हाण, नांदेड या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या विजयामागे वंचित फॅक्टर निर्णायक ठरला असच दिसुन येत आहे.


वंचित बहुजन आघाडीने धर्मनिरपेक्ष विचारधारेचे नुकसान करुन जातीयवादी पक्षांना मदत केली. त्यामुळे अनेक मतदार संघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना अपयश पत्करावे लागले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावरुन लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीशी हात मिळवणी न केल्याचा पश्चाताप काँग्रेस आघाडीला निश्चितच झाला असल्याचे दिसुन येत आहे. गेली चार-पाच वर्षे जोरदार खडाजंगी होऊनही लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेने बरोबर युती करण्याचा भाजपचा निर्णय अचूक ठरला आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला युती करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु ती संधी दोघांनीही गमावली.


धर्मनिरपेक्षच्या गप्पा करणाऱ्या काँग्रेसने आजपर्यंत आंबेडकरी समाज, मुस्लीम समाजाचा निव्वळ मतांकरीता उपयोग करुन घेतला आहे. वंचितांचे स्वतंत्र राजकारण उभे राहु नये म्हणून इथल्या प्रत्येक प्रस्थापित पक्षांनी मन:पूर्वक प्रयत्न केले. अशातच वंचित बहुजन आघाडीने स्वत:च राजकारण उभ करुन आपलं अस्तित्त्व सिद्ध करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो वाखण्याजोगा आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूका लक्षात घेता वंचित फॅक्टर पुन्हा एकदा निर्णायक ठरु शकतो.


पाच वर्षे शिवसेना सरकारमध्ये असुनही विरोधी भुमिका घेत होता. तरीही त्यांना परत युतीत आणण्याचे जे कसब भाजपने दाखवले, हेच व्यवहार चातुर्य काँग्रेसने दाखवले असते तर आज चित्र वेगळ असतं. सन्मानाने सोबत घेण्याची जबाबदारी मोठ्यांची असते परंतु काँग्रेस येथे सपशेल हरली. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूका लक्षात घेता काँग्रेसला लहान पक्षांकडे जावच लागेल. तस केल नाही तर विधानसभा निवडणूकांच्या विजयापासुन लांबच रहाव लागेल.



अल्प कालावधीत तयार केलेली आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते लक्षणीय आहेत. लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभा निवडणूकीलाही आता सुरुवात होईल. या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभा विधानसभा निवडणूकीत काँग्रेस आघाडीसोबत वंचितची आघाडी न झाल्यास त्याचा फटका शिवसेना-भाजप युतीला नाही, तर काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी सोबत युती न झाल्यास वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीला अडचणीची ठरण्याची दाट शक्यता आहे.

  

-    गिरिश कांबळे    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पत्रकार बाबासाहेब आंबेडकर...!

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पु...